पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यंदा राज्याचा 85.88 टक्के इतका निकाल लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 टक्के निकाल लागला असून, नागपूर विभागाचा सर्वात कमी 82.51 टक्के निकाल लागला आहे. औरंगाबाद विभागाचा 87.29 टक्के तर लातूर विभागाचा 86.06 टक्केनिकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 7.85 टक्के अधिक आहे. 87.88 टक्केनिकालासह पुणे विभाग राज्यात दुसर्या क्रमांकावर असून, 87.55 टक्के निकालासह अमरावती तिसर्या तर 87.29 टक्के निकालासह औरंगाबाद विभाग चौथ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आली. सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मेच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले, त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर हा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत बारावी परीक्षेच्या निकालाविषयी माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 2.51 टक्क्यांनी कमी लागला आहे. नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के लागला असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 7.85 टक्क्यांनी जास्त आहे.
यंदा राज्यभरातून एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी व 6 लाख 48 हजार 151 विद्यार्थिनी आहेत. राज्यातील 9 हजार 771 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक 5 लाख 69 हजार 446 विद्यार्थ्यांनी तर त्यापाठोपाठ कला शाखेच्या 4 लाख 82 हजार 372 तर वाणिज्य शाखेतील 3 लाख 81 हजार 446 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 58 हजार 12 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक 3 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी तर कोकण विभागातून सर्वात कमी 32 हजार 362 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
राज्यातील तब्बल 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. शाखेनुसार विचार करता यंदा विज्ञान शाखेचा निकाल 92.60 टक्के, वाणिज्य शाखेचा 88.28 टक्के आणि कला शाखेचा निकाल 75.45 टक्के लागला आहे. आयपॅडवर परीक्षा देणार्या निशिका या दिव्यांग विद्यार्थिनीला 73 टक्के गुण मिळाले आहेत. निशिका ही मुंबईतील सोफिया कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
विभागवार निकाल
पुणे विभाग : 87.88 टक्के
औरंगाबाद विभाग : 87.29 टक्के
लातूर विभाग : 86.06 टक्के
मुंबई विभाग : 83.85 टक्के
कोकण विभाग : 93.23 टक्के
कोल्हापूर विभाग : 87.12 टक्के
अमरावती विभाग : 87.55 टक्के
नाशिक विभाग : 84.77 टक्के
नागपूर विभाग : 82.51 टक्के
विविध शाखांचा निकाल
विज्ञान शाखा निकाल : 92.60 टक्के
कला शाखा निकाल : 76.45 टक्के
वाणिज्य शाखा निकाल : 88.28 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम : 78.93 टक्के